सदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन
( गुरुवार, दिनांक २० जून २०१९)
हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ.
नाथसंविध्, नाथसंविध्, नाथसंविध्.
तर आज मराठीतून बोलूया, चालेल? तर गुरु़चरणमास सुरु झालेला आहे, हो ना? नक्की, माहिती आहे? काय करतो आपण तेव्हा? काय म्हणतो?...[हनुमानचलीसा] ‘हनुमानचलिसा’ म्हणतो....किती वेळा? [१०८ वेळा] किती दिवसांमध्ये?...[महिन्यातून एकदा] महिन्यातून एकदाच म्हणतो? कमीतकमी एकदा....एक दिवस म्हणायचं असतं. पाहिजे तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता, काही जण दररोजही म्हणतात.
तर गुरु़चरणमास सुरू झालेला आहे, त्यानंतर लगेच....लवकरच श्रावण येतो. श्रावणामध्ये मर्द लोकांची प्रपत्ती असते, बरोबर की नाही? Yes it is. ‘मर्द पर्वणी’ आहे ती खरोखरच. कारण हे व्रत कसं आहे? एका सोमवारी केलं किंवा सगळ्या सोमवारी केलं तरी पुरुषाचं पुरुषत्व बहारीस आणून देणारी, कर्तृत्व बहारीस आणून देणारी गोष्ट आहे ही प्रपत्ती म्हणजे. तर संक्रातीच्या दिवशी स्त्रिया जी प्रपत्ती करतात - ‘चण्डिकाप्रपत्ती’, ती स्त्रियांच्या सगळ्या, सर्व कुटुंबाचं संरक्षण करणारी असते.
तर श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्व कसलं असतं? अनेक व्रतवैकल्यं असतात, बरोबर की नाही? आपण कंटाळतो आणि (विशेषत:) ज्यांना चिकनबिकन असं जरा नेहमी लागतं, त्यांना जर ‘हा श्रावण महिना न येईल तर बरं’ (असंच वाटत असतं). ‘बापू, ‘अधिक महिना’ येतो तसा एक ‘वजा महिना’ का येत नाही की श्रावण आलाच नाही एक वर्ष’. आणि त्याच्यासाठी आम्ही आधी ‘गटारी’ साजरी करतो, बरोबर की नाही? त्या अमावास्येचं मूळ नाव आम्ही विसरून गेलोय आणि ‘गटारी’च नाव राहिलं; दिवसभर खायचं, चरायचं आणि टल्ली होऊन पडायचं, राईट?
पण श्रावण महिना हा बेसिकली श्रवणभक्तीचा महिना आहे आणि शिवभक्तीचा महिना आहे. ‘शिव’ हे एक परमात्म्याचं रूप असं आहे की जे कुटुंबवत्सल आहे. एका बाजूला घोर विरक्त आहे; तर दुसर्या बाजूला, हा पूर्णपणे अनुरक्त असणारा, आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम करणारा आणि सपरिवार असणारा असा आहे. बघा, प्रजापती ब्रह्माला सगळे मानसपुत्र आहेत, विष्णूलासुद्धा मूळ रूपामध्ये एकही पुत्र किंवा कन्या नाही, अवतारांमध्ये आहेत. पण मूळ रूपामध्ये सगळं कुटुंब असणारा कोण आहे? एक परमशिव आहे. परमात्म्याचं ते एकच रूप असं आहे की ज्याचा कुटुंबविस्तार नीट विस्तारला आणि त्यामुळे शिव-पार्वती हे भारताच्या प्रत्येक घरांघरामध्ये अत्यंत जवळचे असतात. लग्नाच्या वेळेससुद्धा वधु अंतरपाटावर येईपर्यंत काय करत असते? [गौरीहार] गौरीहार नाही, गौरीहर. गौरीचं हरण ज्याने केलं म्हणजे गौरीचं मन ज्याने जिंकून घेतलं, त्या गौरीहराचं म्हणजे शिवाचं पूजन करत असते. का? जसा शिव त्याच्या पत्नीची पूर्णपणे काळजी घेतो आणि प्रेम करतो, तशी तिची काळजी तिच्या पतीने घ्यावी, तिचा पती शिवासारखाच पराक्रमी व्हावा म्हणून ती पूजन करत असते; आणि अंतरपाटावर आल्यावर मात्र जोरात काय म्हटलं जात? ‘सावधान’! बाबा, आता ती माळ गळ्यात पडणार आहे....पण काही सांगता येत नाही! बरोबर की नाही?
(बाय द वे) किती जणांना तुम्हाला असं वाटतं, आपण पळून गेलो असतो तर बरं झालं असतं? हात वर करा, हात वर करा.
हिम्मत नाही बघा (एकाचीपण), बायका उभ्या आहेत म्हटल्यावरती, बरोबर की नाही?
मजा सोडून द्या. पण तरी ते ‘सावधान’ हे वेगळ्या कारणासाठी असतं; की ‘सावध हो, आता जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो आहे.’ एक सुंदर प्रवास असतो पती-पत्नीचा मिळून आणि तो अधिक सुंदर करण्यासाठी हा श्रावण महिना अत्यंत महत्वाचा असतो अणि नुसता श्रावण महिना नाही, तर शिवपार्वतीचं पूजन अत्यंत महत्वाचं असतं.
मी जेव्हा तपश्चर्या केली होती २०११ साली....आठवतंय का कोणाला तरी, थोडफार तरी? किती जणांना आठवतंय? हात वर करा? बर्याच....९०% लोकांना आठवतंय, I am happy. त्या तपश्चर्येमधून जे काही मागितलं गेलं आईकडे....माझ्या आईकडे, जगदंबेकडे; त्याचा एक भाग आपण ह्यावर्षीपासून सुरुवात करतो आहोत. म्हणजे ‘श्रीशिव सहपरिवार पूजन’. म्हणजे शिवाचं पूजन, त्याच्या संपूर्ण परिवारासह, कुटुंबासह. [टाळ्या]
आता आपल्याला प्रश्न पडेल की (शिवाच्या) ह्या कुटुंबामध्ये आहे कोण? तर स्वत: शिव आहेचं, पार्वती ‘अन्नपूर्णा’ रूपाने आहेच. कारण तिचं मूळ नाव ‘अन्नपूर्णा’च आहे. त्याबरोबर शिवाचे दोन पुत्र आहेत, स्कंद कार्तिकेय आणि गणपती. आणि....? [आई] नाही, आई नाही, आई आहेच....सगळीकडे आहेच. इकडे ‘परिवार’ हा, ‘कुटुंब’ हा एक कनसेप्ट आहे ह्यामध्ये. आणि कोण असेल? [नंदी]नंदी Yes, very good नंदी हा अविभाज्य घटक आहे शिवाच्या परिवाराचा. पण आणखीन कोण? [गंगा] गंगा? अरे पार्वती भांडायला उठेल. गंगा शिवाच्या मस्तकावर सदैव आहे आणि पार्वती-गंगा एकरूप आहेत....ह्यांच्यात भांडण नाही, लक्षात ठेवा, ते आपण फक्त कथांमध्ये ऐकतो, त्याला काही अर्थ नसतो. शिवाच्या बरोबर आणखीन कोण कोण आहे बघूया ना जरा? [शेषनाग] शेषनाग? [मूषक] मूषक? मग कार्तिकेयाचा मोर का नाही? मग पार्वतीचं वाहन काय? सिंह का नाही? अरे मारामार्या सुरू होतील तिकडे. मोर आणि नागाची मारामारी सुरू होईल, आणखीन सिंहाची आणि बैलाची मारामारी सुरू होईल. सिंह बैलाला खायला जाईल. बरोबर की नाही? ‘नंदी’ एक पुरे झाला बापाचं वाहन, जो सगळ्यांना घेऊन जातो.
शिवाला दोन कन्या आहेत, किती जणांना माहिती होतं शिवाला दोन कन्या आहेत ते? हात वर करा [कोणीच हात वर केला नाही]. I am happy, you are honest, o.k.? So, शिवाला दोन कन्या आहेत, लक्षात ठेवा. भारतात त्यांची मंदिरं पण आहेत. पण शिवाला कन्याही आहेत दोन, जे आत्तापर्यंत आपल्याला माहिती नसेल; आणि कन्येशिवाय परिवार पूर्ण होत नाही. ह्या दोन कन्यांची नावं काय? तर जेष्ठ कन्या जी आहे, तिचं नाव ‘विशोकसुंदरी’. बालाविशोकसुंदरी, नुसतं नाही.... ‘बालाविशोकसुंदरी’; आणि ही पार्वतीच्या उदरी जन्मली. कशी? तर जेव्हा ‘बाला त्रिपुरा’ उत्पन्न झाली आई जगदंबेपासून आणि त्या बालात्रिपुरेला पाहून पार्वतीच्या मनात भावना उत्पन्न झाली, ‘हे आई माते जगदंबे, हे आई अनसूये! मला दोन पुत्र आहेत. परत वीरभद्र हा माझा मानसपुत्रही आहे, पण माझ्याकडे कन्या नाही आहे.’ हा ‘कन्या’भाव किती सुंदर आहे! ही तिची जी भावना आहे, त्या भावनेमधून तिच्या उदरात जो गर्भ राहिला कन्येचा, ती कन्या म्हणजे बालाविशोकसुंदरी. ती शोक हरण करणारी आहे, विशोक, ‘विगत: शोक:’ ही विशोकसुंदरी आहे.
अनेक जण गोंधळ घालतात की ‘दत्तमाहात्म्य’ आणि ‘दत्तपुराणां’मध्ये, हुंडासुर जिला पळवून नेतो, त्या ‘अशोकसुंदरी’ नावाच्या एका राजकन्येचं वर्णन येतं. ती ‘अशोकसुंदरी’ आणि ही ‘विशोकसुंदरी’ ह्याच्यामध्ये कन्फ्युजन केलं जातं. ती अशोकसुंदरी मानवी स्त्री आहे, तर विशोकसुंदरी....बालाविशोकसुंदरी ही शिवाची आणि पार्वतीची कन्या आहे; आणि बालात्रिपुरेला पाहिल्यामुळे जो भाव उत्पन्न झाला, त्याच्यातून उत्पन्न झाल्यामुळे हिचं नाव ‘बालाविशोकसुंदरी’. ही जेष्ठ कन्या; आणि कनिष्ठ कन्येचं नाव आहे - ‘ज्योती’ किंवा ‘ज्योतिर्मयी’ किंवा ‘ज्योतिष्मती’. ही कन्या शिवाच्या प्रभामंडलात जे तेज होतं, (त्यातून उत्पन्न झाली). शिवाने आपले डोळे उघडले समाधीतून. समोर अत्यंत लावण्यखाणी अशी पार्वती उभी होती, जिच्याकडे पाहिल्याबरोबर शिवाच्या मनात जो प्रेमाचा कल्लोळ उठला, त्याच्याकडे पाहून, त्याचा आनंद पाहून पार्वती नृत्य करू लागली - ‘लास्य’. पार्वतीच्या नृत्याला ‘लास्य’ म्हणतात आणि ते लास्य पाहून शिव अधिकाधिक आनंदित होऊ लागला. ह्या त्याच्या पार्वतीवरच्या प्रेमाच्या आनंदामुळे त्याच्या प्रभामंडलातून एक कन्या उत्पन्न झाली. ती कन्या म्हणजे ‘ज्योती’ किंवा ‘ज्योतिर्मयी’ किंवा ‘ज्योतिष्मती’. तशा दोन कन्या आहेत.
....आणि आपण जे पूजन करणार आहोत ‘शिव-सपरिवार पूजन’, त्याच्यामध्ये आई जगदंबा मागे असणारच आहे. परंतु परमशिव, अन्नपूर्णा पार्वती, त्यानंतर ‘स्कंद’ स्कंदचिन्हाच्या रूपात, ‘गणपती’ गणपतीच्या मूर्तीच्या रूपात आणि ह्या बालाविशोकसुंदरी आणि ज्योती किंवा ज्योतिर्मयी किंवा ज्योतिष्मती ह्या दोन कन्या. ह्याच्याबद्दलचे डिटेल्स लवकरच आपल्या अग्रलेखांतच येणार आहेत, त्यामुळे इथे जास्त देत नाही.
पण हे शिवपूजन ह्या श्रावण महिन्यापासून आपण सुरू करणार आहोत. संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी, मंगल होण्यासाठी, सर्व शुभ होण्यासाठी, सर्व क्लेश निवारण होण्यासाठी. कुटुंब म्हणून जे एकत्रितपणा आहे, तो राहण्यासाठी, टिकण्यासाठी....ते प्रेम, ती आप्तता टिकण्यासाठी.
तर आज आपल्याला नवीन माहिती मिळाली की शिवाला दोन कन्या आहेत. मात्र त्यांचं एक असतं - त्यांच पूजन नेहमी शिवाबरोबरच, शिवपार्वतीबरोबरच करावं लागतं, सेपरेट पूजन त्यांचं होऊ शकत नाही कारण त्या परिवाराचा हिस्सा म्हणूनच कार्य करत आलेल्या आहेत. तर असं शिवपूजन आपल्याला करायची संधी ह्या श्रावण महिन्यापासून, नेहमी आपण करतो तशी जुईनगरच्या मंदिरामध्ये available करून दिली जाणार आहे.
आता असा हा शिव. एका बाजूला अतिशय विरक्त असणारा, सदैव समाधीत असणारा, ध्यानयोग लावून बसणारा, निर्विकल्प समाधी असणारा. अंगावर म्हटलं तर कपडे आहेत, नाहीतर दिगंबर अवस्थेत किंवा व्याघ्रचर्म पांघरून आहे. एकही दागिना त्याने अंगावर घातलेला नाही, जटाजूट वाढलेल्या आहेत, दाढीमिशा वाढलेल्या आहेत, दिसायला उग्र आहे, (लोक) घाबरतात - तिसरा डोळा उघडला तर काय!
पण त्यालाच आपण काय म्हणतो? भोलेनाथ! हा अतिशय भोळा आहे आणि परमात्म्याचं हेच भोळं स्वरूप जे आहे नं, ते श्रद्धावानासाठी असतं, लक्षात ठेवा. त्याचं जे कारस्थानी रूप असतं किंवा लढवय्या रूप असतं, ते असुरांसाठी असतं, अभक्तांसाठी असतं, श्रद्धावानांच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी असतं. पण आम्ही मात्र घाबरत राहतो. आमचा कुलदेव आहे. कुलदेव कोपला, आमची कुलदेवी कोपली, आम्ही लग्नामध्ये साडी द्यायला विसरलो, आम्ही बकरा कापायला विसरलो, आम्ही उंदीर कापायला विसरलो, आम्ही वाघ कापायला विसरलो! वाघ कापायला कोण जातं का? कोणाचा आहे का कुळाचार वाघ कापायचा? वाघ कापायचा कुळाचार कधी ऐकलाय तुम्ही? किंवा हत्ती कापायचा कुळाचार ऐकलाय कधी? सिंह कापायचा कुळाचार ऐकलाय कधी? नाही ना, हिंमत नाही आमची. ‘अजापुत्रं बलिं दद्यात्’ बिचारा बकरा, तो कापला तरी काय करणार आहे? त्याचा बळी आपण देतो. ज्यांच्याकडे परंपरेनुसार चालू आहे, त्यांनी चालू ठेवलं तरी मला काहीही problem नाही, खरंच सांगतो. पण हा विचार आपण केला पाहिजे की जिने सर्व सृष्टी उत्पन्न केली, तिला अशा बळींची काय गरज आहे? आणि जिने किंवा जिच्या पुत्राने ठरवलं की प्रलय करायचा, जो एका क्षणात प्रलय आणून सगळ्यांची-सगळ्यांची आहुती घेऊ शकतो आतमध्ये, एक आचमन घेतलं, बस्स् संपलं! आचमन घ्यायची क्रिया करायचीही जरूरी नाही. त्यांना बळीची काय आवश्यकता आहे? सुंदरकाण्ड मध्ये आपण वाचतो, हनुमंत काय सांगतो? बिभीषण काय सांगतो रामाबद्दल की जो काळालाही खातो, सगळ्या अमरांना म्हणजे देवांनाही गिळतो, असा हा राम, असा हा स्वयंभगवान आहे, बरोबर?
पण परंपरा चालू आहे, मनाला भय वाटतंय तर चालू ठेवा, काही हरकत नाही, मला problem नाही. नाही तरी आपण चिकन आणि मटण खातोच ना, त्यासाठी कापताच ना, मग इकडे कापा, हरकत नाही. I have no problem. पण ते नाही केलं तर त्याच्यामुळे देव कोपतो, ही भीती काढून टाका. कुळाचार प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीनुसार जरूर करावा, मला खरंच काही problem नाही. परंतु ‘ते मी नाही केलं किंवा करण्यात काही चूक झाली, तर देव कोपतो’ ही भावना मात्र पहिली सोडायला हवी. कारण देव आपल्या लेकरांवर कोपत नाही. आई समजा चिडलीच, बाप चिडला, तर पोराचा काय गळा दाबणार आहेत का सांगा मला? आज तुम्ही किती वेळा तुमच्या पोरांना झोडत असाल, ओरडत असाल, चिडत असाल. आई किती वेळा मराठीमध्ये म्हणते, ‘मेल्या’, ‘ही कार्टी ना मेली माझ्या मागे नुसती उगीच त्रास देतात.’ ‘मेली’ म्हणताना तिची काय अशी इच्छा असते मरावी कार्टी म्हणून? नाही, ते प्रेम असतं. हे जर सामान्य मानवी आई-बापाचं आहे, तर ‘त्या’ आई-बापांचं काय असेल विचार करा.
तर पहिल्यांदा तुमच्या मनातून विचार काढून टाका की कुलदेव कोपतो, कुलदेवी कोपते किंवा गावदेव कोपतो, अमूक कोपतो, तमूक कोपतो. अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी नाहीत. डेफिनेटली नाही. ह्या भाकडकथा आहेत. ह्या कथांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. आलं लक्षामध्ये?
फक्त तुम्ही नवस बोलला असाल (आणि तो) नवस पूर्ण केला नसेल, तर देव तुम्हाला आठवण करून देतो. साईचरित्रामध्ये एक शब्द येतो बघा माधवराव देशपांडेच्या गोष्टीत, की त्या माधवराव देशपांडेंच्या आईने नवस केलेला असतो. एक ज्योतिषी येऊन सांगतो, ‘म्हणून देवी नडा करतेय’. ‘नडा करतेय’ म्हणजे ‘नडते’ अशा अर्थाने नाही आहे तो शब्द. ‘नडा करणं’ ह्याचा अर्थ काय आहे? की ती वारंवार आठवण करून देते. आपण आज ‘नडणं’ शब्द कशा अर्थाने वापरतो? तर एखाद्या माणसाला अडवणं किंवा पिडणं, त्रास देणं. खरा तसा नाहीये ‘नडला’ ह्याचा अर्थ. ‘नडा करणं’ म्हणजे ‘आठवण करून देणं’. तर देवी आठवण करून देते. ते दैवत, ज्या दैवताला तुम्ही नवस केलेत, ते दैवत तुम्हाला आठवण करून देतं राहतं, बस्स् तेवढंच. सजा करत नाही.
तर पहिल्यांदा आपल्या मनातली भीती गेली पाहिजे की देवीला हिरवी साडी द्यायची होती, आम्ही विसरलो, आठ बांगड्यांच्या ऐवजी सहाच बांगड्याच वाहिल्या, गणपतीला लाल फुलाऐवजी पांढरं फुल वाहिलं....ह्याने देव रागावत नाही. जी देवाची भक्ती करायची, तुमच्या कुलदेवाचं, इष्टदेवाचं, ग्रामदेवाचं दर्शन घ्यायचं, ते प्रेमाने घ्या, भीतीने घ्यायची काहीही आवश्यकता नाही; आणि त्यासाठीच ह्या परमात्म्याचं ‘शिवस्वरूप’ एका बाजूला अत्यंत शांत, वीतराग आहे, अत्यंत प्रेमळ, कुटुंबवत्सल पिता आहे, पती आहे. तर दुसर्या बाजूला तिसरा डोळा उघडून कामदेवाचंही दहन करणारा, सगळ्या जगाचं दहन करणारा, एवढा तेजस्वीही आहे; आणि त्याच्याबरोबर ‘भोलेनाथ’ पण आहे. अत्यंत भोळा, कोणी काही मागितलं की काहीही देणारा. रावणाने पार्वती मागितली, त्याने पार्वती पण देऊन टाकली. पण तो काही धर्मराजासारखा नव्हता. धर्मराजाने आपली बायको द्युतात पणाला लावली. तसा शिव नव्हता. शिवाला पूर्ण खात्री होती की आपली बायको काय आहे; ती रावणाने पळवून नेली तर रावणाची वासलात लागली ह्याची पूर्ण खात्री होती त्याला. आलं लक्षात नं? ती साक्षात शक्ति आहे. तर हे आपण जाणलं पाहिजे की तो भोळा असला, तरी तो मूर्ख नाहीये. ‘भोळा’ आणि ‘मूर्ख’ ह्यांच्यामध्ये खूप फरक आहे. तो भोळा आहे, कोणासाठी? आपल्या भोळ्या भाविकांसाठी. आपल्या भक्तांसाठी.
आणि श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना, गुरुचरणमास असे जे मुद्दाम निवडले गेलेले महिने आहेत, हया महिन्यांमधली स्पंदनं खूप वेगळ्या प्रकारची असतात. ती स्पंदनं ‘तो एक’, तो स्वयंभगवान, तो त्रिविक्रम आपल्या सर्व श्रद्धावानांसाठी खास तयार करून सोडत राहतो, त्या-त्या महिन्याला अनुरूप अशी. एरव्ही पण पाठवतच असतो भरपूर, पण ह्या खास महिन्यांमध्ये तो अतिशय मुक्तहस्ताने देत राहतो म्हणून ह्या महिन्यांचा लाभ आपण उठवायचा असतो.
साईचरित्रामध्ये आणखीन एक ओळ आहे - ‘स्वार्थासी भोळा दुर्लभ।’ की एकही माणूस असा सापडणार नाही की ज्याला आपला स्वार्थ कळत नाही. तर प्रत्येकाला आपला स्वार्थ नीट कळत असतो. थोडा कमी-जास्त असेल. ‘स्वार्थ’ काही वाईट गोष्ट नाही. ‘स्वार्था’वरती मी प्रवचनं केलेली आहेत मला वाटतं दहा-बारा, बरोबर की नाही? तर ‘स्वार्थ’ ही काही वाईट गोष्ट नाही, फक्त दुसर्या कोणाला पीडा करू नये बस्स्. आपल्याला जे साधायचंय ते जरूर साधावं. दुसर्याला त्रास न देता, त्याचं उगीचच्या उगीच वाईट न करता, चांगलं आहे ते जरूर मिळवावं. पण ‘स्वार्थासी भोळा दुर्लभ’ हे जर खरं आहे, ‘आहार-निद्रा-भय-मैथुन। सर्व जगतासी समसमान।’ हे जर सगळ्यांना समान आहे, तर आपल्याला समजलं पाहिजे कि ‘मी भित्रा आहे’ हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती असतेच. मग तो इतरांना त्या, इतरांच्या ठिकाणी बघून काय म्हणतो, ‘अरे, तो ह्या-ह्या गोष्टीला घाबरत नाही. मीच भित्रा आहे.’ लक्षात ठेवा, भय हे सर्वांना समानपणे आहे. फक्त तुमची भीती वेगळी आणि तुमच्या बाजूच्याची भीती वेगळी. म्हणून कधी असं समजू नका की ‘तो शूरवीर आहे आणि मी भित्रा आहे’ किंवा ‘मी शूरवीर आहे आणि तो भित्रा आहे’. तुम्हाला ज्याची भीती वाटते, त्याची त्याला भीती वाटत नाही एवढंच.
त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की स्वार्थ....खरा स्वार्थ साधायचा असेल, तर श्रद्धावानांसाठी ह्या मुबलक संधी दिलेल्या आहेत. श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना, ही निरनिराळी व्रतं, व्रताधिराज, गुरुचरणमास ह्यांच्यामुळे आपण maximum आपल्यासाठी - कोणाच्या शब्दात ‘पुण्य’, कोणाच्या शब्दात ‘स्पंदनं’, कोणाच्या शब्दामध्ये ‘पवित्र शक्ति’, कोणाच्या शब्दामध्ये ‘पवित्र शक्तिची Bounty’ म्हणजे देणगी, कृपा, अनुग्रह (मिळवत असतो). हे सगळं मिळविण्यासाठी हे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध केलेले असतात. कोणी? ‘त्या’ एकाने, त्रिविक्रमाने, स्वयंभगवानाने.
तर ह्या श्रावण महिन्यापासून, आपत्ती आणि विपत्ती ह्यांचा नाश करते ती प्रपत्ती - ती ‘महादुर्गेश्वर प्रपत्ती’, ही पुरुषांनीं मनापासून करायला सुरुवात करा. तुमचं पुरुषत्व, तुमचं कर्तृत्व, तुमचं कुटुंबसंरक्षण ह्या सगळ्या गोष्टी आपोआप सुधारतील. तुमचं व्यावसायिक कौशल्यही सुधारेल. एक कुटुंबप्रमुख म्हणून, एक घरातला कर्ता पुरुष म्हणून तुमची असणारी भूमिकासुद्धा अधिक तेजस्वी होईल. खरंच सांगतो, स्त्रिया जास्त मनापासून चण्डिकाप्रपत्ती करतात. (टाळ्या) Yes. अगदी खरंच सांगतो, अगदी मनोभावे करतात. पुरुष मात्र - श्रावणातल्या पाचमधला, चारमधला एकच सोमवार करायचा; तोसुद्धा जेवढा लवकर आटपेल तेवढा बरा, तेसुद्धा बाकीचं सगळं सांभाळून, (असं करतात). अशाने फळ मिळत नाही. मनापासून करा, चुकलं तरी हरकत नाही. (प्रपत्तीची) कथा किती सुंदर आहे, विचार करा! तर, श्रावणामध्ये प्रपत्ती करायचीय आणि स्वत:चं जीवन सुधारून घ्यायचंय, हे लक्षात ठेवा. खरा स्वार्थ साधायचाय. स्वार्थी बना, पण चांगल्या मार्गाने बना.
नक्की? [नक्की] किती टक्के? [१०८]. आता विचारतो,
नक्की? [नक्की], नक्की? [नक्की],नक्की? [नक्की],
So, १०८ वेळा हनुमानचलीसा सगळे करणार ह्या महिन्यामध्ये? [होऽऽऽ]. मी केलं. मी, नंदा आणि सुचित आम्ही तिघांनी एकाच दिवशी (१०८ वेळा हनुमनचलीसा पठण) केलं, सोमवारी. मग जर मी करतोय तर माझ्या पोरांनी करावं अशी अपेक्षा असणारच. बरोबर? [yes] o.k.? so done. Done नक्की? (नक्की).
(Thumbs up Sign) असं कि (Thumbs down Sign) असं?
(उपस्थित Thumbs up Sign ला) [असं]
नक्की? [नक्की], All the best, Love you [Love you DAD], Love you [Love you DAD].
॥ हरि: ॐ॥ श्रीराम॥ अंबज्ञ॥ नाथसंविध्॥




